मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज राष्ट्रपादी रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आक्रमक भूमिका घेतलीय. काँग्रेस नेत्यांच्या मागणीला पाठिंबा देत शरद पवार यांनीही आता केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर पवारांनी जोरदार निशाणा साधला.
उत्तर प्रदेशातील बातम्या आपण वाचतो, पाहतो आहोत. लखीमपूरच्या घटनेचे काही व्हिडीओ सुदैवानं समोर आले. त्यातून एक दिसलं की शांतपणे जाणाऱ्या जमावावर काही लोकांकडून गाडी घातली जाते. त्यात चार शेतकऱ्यांची, काही लोकांची आणि एका पत्रकाराची हत्या होते. असा प्रकार कधी घडलेला नव्हता. काही लोकांनी सांगितलं की केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे चिरंजीव त्या गाडीत होते. ते सुरुवातीला नाकारलं गेलं. कारवाईची मागणी झाली. पण त्यावर उत्तर प्रदेश किंवा केंद्र सरकारनं काही पाऊल टाकलं नाही. पाच-सहा दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रतिक्रिया व्यक्त केली.