सोलापूर – कामगार नेते कुमारदादा करजगी दानशूर व्यक्तिमत्व आहेत .त्यांनी सोलापूर शहर राष्ट्रवादी कार्यालयासाठी मोक्याची जागा दिली आहे. त्यांचे ऋण कधीही विसरणार नाही ,असे सांगत जेव्हा – जेव्हा त्यांना काही मदत लागेल, तेव्हा सर्वतोपरी मदत करण्यास आपण तयार असल्याची ग्वाही ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली .
सोलापूर शहर राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जुनी मिल कंपाऊंड येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी कामगार नेते कुमार दादा करजगी यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा बोलत होते. उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले, सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्यालय अत्यंत सुसज्ज असे झाले आहे. शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी कार्यालयात सर्व सेलच्या प्रमुखांना बसण्याची व्यवस्था केली आहे .ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या कार्यालयासाठी कुमारदादा करजगी यांनी कोणत्याही प्रकारचे भाडे आकारले नाही. त्यामुळे कुमारदादांसारखे दानशूर व्यक्ती फार कमी असतात, असे सांगत कुमारदादा करजगी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजाचे चांगले करण्याचे आणि चांगले विचार जनमानसात रुजवण्याची प्रेरणा त्यांना मिळावी तसेच त्यांचे आशीर्वाद सर्वांना मिळावे , असेही उपमुख्यमंत्री अजितदादा यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार संजयमामा शिंदे, प्रदेश सरचिटणीस उमेश पाटील,शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.