येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची तयारी केली आहे. तसंच मध्यप्रदेशातही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, लव्ह जिहाद विरोधात महाराष्ट्रातही कायदा आणावा, अशी मागणी भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.
“उत्तर प्रदेशात सरकारनं लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची पूर्ण तयारी केली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाचं आम्ही समर्थन करतो. उत्तर प्रदेशसारखा कायदा महाराष्ट्रातही लागू करण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू,” असं सोमय्या म्हणाले. “अस्लम शेख यांनी याकूब मेननच्या फाशीला विरोध केला होता. फेनेटीक इस्लामिकऑरगनाझेशन संघटनेचंदेखील त्यांच्याकडून समर्थन करण्यात आलं होतं. आम्ही महाराष्ट्रात लव्ह जिहाद होऊ देणार नाही,” असंही ते म्हणाले.
“अस्लम शेख लव्ह जिहादवर जे बोलतात तीच भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बोलतात,” असा आरोप सोमय्या यांनी केला. महाराष्ट्रातही तसा कायदा आणावा. आम्ही विधानसभेतदेखील हा प्रस्ताव मांडू. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेचा रंग बदलला असल्याची टीकाही सोमय्या यांनी यावेळी केली.