मानसी खंदारे, माधुरी घोडके यांनी उत्कृष्ट वेशभूषा करत सावित्रीच्या लेकीचा घेतला मान….!!
कोंडी (प्रतीनिधी) :जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात आणि विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस ट्रेनिंग स्कूलच्या उपप्राचार्य तथा पोलीस उपअधीक्षक अनुराधा उदमले आणि मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे होते.
या कार्यक्रमासाठी पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे सचिव सखाराम साठे, सिनेट सदस्य सचिन गायकवाड आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी रोहन सरवळे, संतोष राऊत, राजेंद्र गोसावी, दत्तात्रय कोकडे, आणि समाधान पांढरे आदी शिक्षकांचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक समाधान पांढरे यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यामधील अतूट नाते आपल्या मनोगतातून प्रभावीपणे मांडले.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अनुराधा उदमले यांनीही यावेळी मुलींनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन शिकून पुढे जावे. असा संदेश मुलींना आपल्या मनोगतातून दिला.
यावेळी बोलताना सखाराम साठे म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणात मुली शिकू लागल्यामुळे निश्चितच देशांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. मुलींनी पांडवाची द्रोपदी बनण्यापेक्षा महात्मा फुलेंची क्रांतीज्योती सावित्री बनवून उत्तुंग अशा प्रकारची भरारी घ्यावी.
या कार्यक्रमासाठी सिताराम पाटील, योगेश नीळ,विकास जाधव आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब निळ यांनी केले. तर आभार प्राचार्य सुषमा निळ यांनी मांडले.