कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगी येथील 25 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यासंबंधी खासगी वाटाघाटीने प्रशासनाने खरेदी करण्याची अधिसूचना जारी केली आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सुरु असलेल्या भूमी संपादनाविरोधात 40 भूखंडधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूमी संपादन कायद्यातील तरतुदीनुसार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम दिली जात असल्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात न्यायाधीश रमेश धनुका आणि न्यायाधीश गौरी गोडसे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, राज्य सरकारलाही तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.
25 हेक्टर जमीन संपादित केली जाणार
दरम्यान, कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगी येथील 25 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यासंबंधी खासगी वाटाघाटीने प्रशासनाने खरेदी करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांशी दरासंबंधी कोणतीही चर्चा न करता गेल्यावर्षी 15 ऑक्टोबरला नोटीस काढून दर निश्चित करण्यात आला होता. तसेच शेतकऱ्यांना या नोटीसद्वारे जमीन संपादन करण्यासाठी आवाहन केले. या नोटीसला याचिकाकर्ते बाबासाहेब म्हालदार आणि इतर सुमारे 40 भूखंडधारकांनी अॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत आव्हान दिले होते.
न्यायालयात धाव घेतलेल्या संबंधितांचे भूखंड हे सक्षम प्राधिकरणाच्या आदेशाने रीतसर बिगर शेती नियमितीकरण झाले आहे. परंतु, नोटीसप्रमाणे जिरायत शेतजमिनीचा भाव नुकसानभरपाई म्हणून प्रशासनाने प्रस्तावित केला आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याचा भूमिसंपादन करण्यास तत्त्वतः विरोध नसला, तरी त्यांच्या कायदेशीर अधिकाराला बाधा न पोहोचता भूमिसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार अभिप्रेत असणारी नुकसानभरपाई तसेच पुनर्वसन आणि प्रकल्पात नोकरी देण्याची तरतूद करण्याचे आदेश शासनास द्यावे, अशी मागणी केली आहे.
कोल्हापूर विमानतळावरुन 4 लाख 38 हजार जणांचा प्रवास
दरम्यान, कोल्हापूर विमानतळ प्रगतीपथावरुन कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली साताऱ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. गेली पाच वर्षे आणि दोन महिन्यात सुमारे 4 लाख 38 हजार 277 जणांनी कोल्हापूर विमानतळावरुन हवाई प्रवास केला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रवास कोल्हापूर ते हैदराबाद या विमानसेवेचा 54 हजार 330 जणांनी लाभ घेतला आहे. सध्या बंगळुरु, हैदराबाद, तिरुपती, अहमदाबाद येथे विमानसेवा सुरु असून याचा लाभ प्रवाशांना होत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील युवक, युवती मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. त्यांना कोल्हापूर विमानतळ सोयीचे झाले असून यामुळे त्यांच्या वेळेची बचत झाली आहे. लवकरच अन्य शहरांशी जोडणारी विमानसेवाही सुरु होणार आहे.