येस न्युज नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे नेते, माजी आमदार राजा पटेरिया यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. आज पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. पटेरिया यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्यांना अटक करण्यात आली.
पटेरिया काय म्हणाले होते?
काँग्रेसचे माजी आमदार राज पटेरिया यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल झाली. या व्हिडिओनुसार, राज पटेरिया हे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी भाषणात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. पटेरिया यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रक्रिया संपुष्टात आणतील. मोदी धर्म, जाती, भाषा या मुद्यांच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडतील. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समुदायाचे भवितव्य धोक्यात आहे. देशाचे संविधान वाचवायचे असल्यास मोदी यांच्या हत्या करण्यास तयार असले पाहिजे. हत्या म्हणजे, त्यांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी काम करा, असे वक्तव्य केले होते. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील एका गावात त्यांनी भाषण केले. त्यावेळचा हा व्हिडिओ असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपकडून वक्तव्याचा निषेध
माजी आमदार राज पटेरिया यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भाजप नेत्यांनी पटेरिया यांच्या वक्तव्याचा निषेध करताना त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे देशभरातून काँग्रेस संपत चालली असल्याचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले. या वक्तव्याबाबत काँग्रेसने माफी मागावी अशी मागणीदेखील त्यांनी केली.