शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी स्वत: करावी- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
सोलापूर : ई-पीक पाहणी हा शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सद्यस्थितीमध्ये खरीप हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदीसाठी ई-पीक पाहणीचे काम सुरू आहे. आज बसवेश्वनर (देगाव, ता. उत्तर सोलापूर) येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून ई-पीक पाहणीचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी ॲपवर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी केले.
यावेळी त्यांच्यासमवेत पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार जयवंत पाटील, तलाठी अनिता कदम, हिरजचे तलाठी पवन चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री.शंभरकर यांनी सांगितले की, आता शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. आपल्याकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल असल्यास आपण शेतामध्ये प्रत्यक्ष पिकांची नोंद करून फोटो अपलोड करू शकतो. ई-पीक पाहणी ही आपण स्वत: करायला हवी. आपल्या पिकांची माहिती भरून ते आपण प्रमाणित करून घेता येते. यामध्ये काही दुरूस्ती असेल तर 48 तासात दुरूस्ती करणे आवश्यक आहे.
बसवेश्वरनगरची महिला शेतकरी चित्रा जकापूरे यांच्या शेतात जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी ई-पीक पाहणीची माहिती शेतकऱ्यांना दिली. ई-पीक पाहणी का महत्वाची आहे, याबाबतही त्यांना समजावून दिले. श्रीमती जकापुरे यांनी गावातील इतर महिलांची जबाबदारी घ्यावी. त्यांनी गावातील 100 महिला शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीबाबत प्रवृत्त करून माहिती स्वत: भरण्यास सांगण्याचे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले. वृद्ध, निरक्षर शेतकऱ्यांसाठी गावात चार मोबाईल दूत नेमले आहेत. त्यांनी मोबाईल दूतच्या मदतीने किंवा आपल्या घरातील नातू, मुलगा यांच्याकडून नोंदणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तलाठी अनिता कदम यांनी महिला शेतकरी श्रीमती जकापुरे यांना ई-पीक पाहणी कशी करावयाची…काय माहिती भरावी, याची कल्पना दिली.
एका मोबाईलवर 50 खातेदारांची माहिती भरा
पूर्वी एका मोबाईलवर 20 खातेदार शेतकऱ्यांची माहिती भरता येत होती. आता किमान 50 शेतकऱ्यांची नोंदणी एका मोबाईलवर करता येत आहे. यामुळे गावातील तरूणांनी आपल्या शेतीबरोबर इतर शेतकऱ्यांनाही ई-पीक पाहणी करण्यास मदत करावी, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.
ई-पीक पाहणीमधील माहिती
ई-पीक पाहणी नोंदणीमध्ये सर्व शेतीची माहिती भरली जाते. यामध्ये खाते नंबर टाकला की मोबाईलवर ओटीपी येतो. पिकांची माहिती, भूमापन क्रमांक, किती गुंठे जमीन, पोट खराब किती, खरीप की रब्बी, पीक कोणते, सिंचनाचे स्त्रोत, सिंचनाची पद्धत, पिकाची लागवड तारीख आणि फोटोसह पिक याची नोंद ई-पीक पाहणीमध्ये आहे.
यावेळी शेतकरी युवराज सुर्वे, शिवाजी कराळे, शिवाजी जकापुरे, अमर कस्तुरे, उमेश जाधव, शिवाजी कदम यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. त्यांनी ई-पीक पाहणीचे महत्व, कशी करावी याची माहिती जाणून घेतली.