नाशिक जिल्हा उपनिबंधक एसीबीच्या जाळ्यात
येस न्युज नेटवर्क : नाशिकसह जिल्ह्यात एसीबीची दिवसाआड कारवाई होत असताना मात्र अधिकारी वर्ग रोजरोसपणे लाच घेत असल्याचे चित्र आहे. एकीकडे कारवाई होत असताना दुसरीकडे मात्र लाच घेणाऱ्या अधिकारी वर्गाचा आलेख हा उंचावतच आहे. याला आळा बसणे महत्वाचे असताना आता पुन्हा जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधकास तीस लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गेल्या अनेक दिवसांपासून धडक कारवाया करत आहेत. मात्र अधिकारी वर्गाचे धाबे दणाणण्याऐवजी एक दिवस होत नाही तोच दुसरा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडत आहे. यात शिपायापासून ते मोठ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत हे जाळे वाढत चालले आहे. तसेच पाचशे रुपयांपासून ते तीस लाखांपर्यंत लाच स्वीकारल्याचे आतापर्यंतच्या घटनांवरुन अधोरेखित होत आहे. आता अशातच जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई एसीबीने केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील लाखाे सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासह आवश्यक परवानग्या आणि निवडणुका लावणाऱ्या जिल्हा उपनिबंधक सतिष भाऊसाहेब खरे यांना 30 लाख रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. खरे यांनी काॅलेजराेडवरील ‘आई’ या निवासस्थानी ही लाच स्वीकारली असून त्यांच्या वकिलाला अटक झाली आहे.