नवी दिल्ली : मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून, भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारवर सडकून घणाघात करताना दिसत आहेत. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास पहिल्या शंभर दिवसांत इलेक्टोल बॉण्डमधून देण्यात आलेल्या देणगीचा तपास केला जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्लीत मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे आणि पंजाब, कुरुक्षेत्र, भिवंडी, मुंबई, लखनऊ आणि जमशेदपूर येथेही जाऊन आलो. खूप लोकांशी बोललो आहे. महागाई आणि बेरोजगारीमुळे प्रचंड त्रास आणि संताप जनतेत आहे. पंतप्रधान त्यावर बोलत नाहीत. मुंबईत ते म्हणाले की, शरद पवार भटकती आत्मा आहेत, उद्धव ठाकरे हे त्यांच्या वडिलांचे खोटे अपत्य आहेत. इंडिया आघाडी तुमचे मंगळसूत्र हिसकावून घेईल. लोकांना त्यांच्या समस्या सोडवायला हव्या आहेत पण खऱ्या प्रश्नांवर ते बोलत नाहीत, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला.
आम आदमी पक्षासाठी सत्ता महत्त्वाची नाही. सरकारमध्ये राहिलो की, बाहेर हे महत्त्वाचे नाही. हे येणारा काळच ठरवेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सर्व गॅरंटी पूर्ण केल्या जातील, याची गॅरंटी देतो. या गॅरंटी सर्वसामान्यांच्या जीवनात महत्त्वाच्या आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.