केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (29 मार्च) कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Assembly Election 2023) घोषणा केली आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे.
कर्नाटक विधानसभा 24 मे रोजी विसर्जित होणार
दरम्यान 2018 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम 27 मार्च रोजी जाहीर झाला होता. यंदा आज म्हणजेच 29 मार्च रोजी तारखा जाहीर झाल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे.
2018 च्या निवडणुकीचा निकाल?
कर्नाटकमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. भाजपने 224 जागांपैकी 104 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 80 जागा आणि जेडीएसने 37 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या आमदारांनी बंड केलं आणि भाजपमध्ये सामील झाले. कर्नाटकात सध्या भाजपकडे 119 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 75, तर मित्रपक्ष जेडीएसकडे एकूण 28 जागा आहेत.
काँग्रेसकडून 124 उमेदवारांची यादी जाहीर
दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकतीच 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये वरुणा विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच या यादीत बहुतांश जुने चेहरे काँग्रेसने कायम ठेवले आहेत.