येस न्युज नेटवर्क : काँग्रेस आणि पक्षातील जी-23 या नेत्यांच्या समुहातील प्रमुख नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पक्षाला राम राम केला आहे. कपिल सिब्बल समाजवादी पक्षात प्रवेश करणार असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कपिल सिब्बल काँग्रेसमधून बाहेर पडल्याने जी-23 गटातून एक नेता पक्षाबाहेर पडला आहे. कपिल सिबल यांनी 16 मे रोजीच आपला राजीनामा काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती दिली.
समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमधून राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाने डिंपल यादव, जावेद अली खान आणि कपिल सिब्बल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कपिल सिबल हे उत्तर प्रदेशमधून काँग्रेसच्या कोट्यातून खासदार आहेत. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त दोनच उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे सिबल यांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी इतर मार्गांची चाचपणी केली असल्याची चर्चा सुरू होती.
कपिल सिबल हे राजकारणासोबत एक कायदेतज्ज्ञदेखील आहेत. अनेक महत्त्वाचे खटले त्यांनी सु्प्रीम कोर्टात लढवले आहेत. सिबल यांनी समाजवादी पक्षासह राष्ट्रीय जनता दल आणि झारखंड मुक्ती मोर्चा आदी पक्षांकडून ऑफर असल्याची चर्चा सुरू होती. या तिन्ही पक्षांच्या महत्त्वांच्या नेत्यांचे खटले सिबल यांच्याकडे आहेत.