सोलापूर : कामती खुर्द (ता. मोहोळ) येथील श्री परमेश्वर आश्रमशाळेतील कलाशिक्षक सुरेश भागवत मलाव यांच्या चित्रांचा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नववीच्या पुस्तकात समावेश केला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून चित्रकला व रंगकाम या कार्यपुस्तिकेत ही चित्रे राहणार आहेत.
पाठ्यपुस्तक महामंडळाने दिलेल्या विविध घटकांवर कलाशिक्षक मलाव यांनी विद्यार्थ्यांना सहजरीत्या समजतील अशारीतीने वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक चित्रे साकारली अाहेत. १९९२ मध्ये कला पदविका परीक्षा जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले मलाव २८ वर्षांपासून कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ग्रेड परीक्षा संकल्प चित्र या पुस्तकाची पाचवी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे. संपूर्ण राज्यात त्यांची पुस्तके पोहोचली आहेत. त्यांना गुणवंत कलाध्यापक, लोकमंगल शिक्षकरत्न, राज्य कलाध्यापक महामंडळाचा राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक, जिल्हास्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावर कला विषयाच्या हस्तपुस्तिकेसाठी समीक्षक म्हणून काम केले आहे. २००८ मध्ये आठवीच्या बालभारती कला हस्तपुस्तिकेसाठी समीक्षणोत्तर संपादकीय म्हणून काम केले आहे. ते दरवर्षी दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांना आकाशकंदील बनवण्याचे प्रशिक्षण देतात. त्यांनी श्री परमेश्वर आश्रमशाळेच्या भिंतीवर काढलेली विविध आशयाची वैशिष्ट्यपूर्ण चित्रे आकर्षक आहेत.