शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या ‘देव यज्ञ’ जनता दरबारात शेकडो नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या आणि अनेक तक्रारींचे तत्काळ निराकरण करून समाधान दिले. सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत चाललेल्या या जनसंपर्क उपक्रमात शहरातील रस्ते, पाणी, वीज, नोकरी, आरोग्य, उद्याने अशा विविध क्षेत्रातील समस्यांवर नागरिकांनी सविस्तर निवेदने सादर केली.
आमदार कोठे यांनी अनेक अर्जांवर जागेवरच निर्णय घेत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत त्वरित अंमलबजावणी केली. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी त्यांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. विशेषतः, नागरी सहकारी बँकेच्या ६२० थकबाकीदारांच्या व्याजदरावरून निर्माण झालेल्या विवादास आमदार कोठे यांनी यशस्वी तोडगा काढला. याआधी १६ टक्के व्याजदराने थकबाकी वसूल करण्याचा निर्णय झाल्यामुळे शेकडो यंत्रमागधारक अडचणीत आले होते. नागरिकांच्या मागणीनुसार आमदार कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेतून ६ टक्के व्याजदराने वसुली करण्याचा निर्णय शासनाकडून मंजूर करून घेतला. या निर्णयामुळे २७२ यंत्रमाग युनिट पुन्हा कार्यान्वित होतील आणि शेकडो कामगारांना रोजगार मिळणार आहे. या महत्वपूर्ण कार्यासाठी आमदार कोठे यांचा नागरिकांनी विशेष सत्कार करत आभार मानले.