सोलापूर, दि.-‘पत्रकार हे समाजाचे जागरूक पहारेकरी असतात. ते समाज मनाचा आरसा असतात. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम पत्रकार करत असतात’ असे प्रतिपादन सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजू भुमकर यांनी केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून येथील सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलातर्फे संकुलाचे संस्थापक अध्यक्ष ‘कै.बाबुरावसा दत्तात्रयसा भुमकर पत्रकारिता पुरस्कार’ वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
सहस्रार्जुन शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजू भुमकर यांच्या हस्ते, सो.स.क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिद्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून सचिव गजानन गोयल,जयकुमार कोल्हापुरे, संस्थेचे सदस्य सर्वश्री श्रीराम पवार,भरतकुमार शालगर,गणेश दामजी यांच्यासह शैक्षणिक संस्थेचे सदस्य सर्वश्री तुकाराम पवार,संजीव रंगरेज,प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा काशीद,इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक डॉ. विष्णु रंगरेज आदि उपस्थित होते.
यावेळी संस्थेतर्फे शिवाजी सुरवसे (येस न्यूज),संगमेश्वर जेऊरे (दैनिक पुढारी),प्रसाद दिवाणजी (तरुण भारत संवाद),अनिल कदम (दैनिक संचार), विक्रम पाठक( दैनिक सकाळ),उमेश कदम (दिव्य मराठी) , श्रीनिवास गाजूल( पुण्यनगरी) ,किरण बनसोडे (तरुण भारत),अजित उंब्रजकर( सुराज्य), रोहित थळवे( इन सोलापूर),सागर सुरवसे (टीव्ही नाईन),आदित्य केंगार( बि.आर.न्यूज) आदि पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल व फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रारंभी अतिथींच्या हस्ते संकुलाचे संस्थापक अध्यक्ष कै..बाबुरावसा भुमकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. सौ .मंजुषा काशीद यांनी प्रास्ताविक केले.शिवाजी सुरवसे, किरण बनसोडे आणि सागर सुरवसे यांनी सत्काराला उत्तर दिले. संजीव बिद्री यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. वैशाली अघोर यांनी कार्यक्रम स्थळी रांगोळीच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी लेखणीची प्रतिमा रेखाटली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहशिक्षक जय कबाडे यांनी केले तर सहस्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन गोयल यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश आळंगे,मल्लेश पुरवंत,अजय कोल्हापुरे,नागनाथ दलभंजन यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.