येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात पुन्हा एकदा करोना संकट निर्माण झालं असल्याने अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसंच अभ्यासावर होत असून अनेकजण परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. यामध्ये एमपीएससीच्या उमेदवारांचाही समावेश आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सध्याची करोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो”.
जितेंद्र आव्हाड यांनी हॅशटॅगमध्ये एमपीएससी परीक्षेचाही उल्लेख आहे. याआधी जेव्हा राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती तेव्हा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा उद्रेक पहायला मिळाला होता. त्यामुळे राज्य सरकारने लगेचच परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या होत्या. दरम्यान ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पहावं लागेल.