सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दशसुत्री कार्यक्रम शिक्षण विभागासाठी सुरू केला आहे . या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा बीबीदारफळ येथे आयोजित करण्यात आलेल्या पाढे वीर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या शाळेतील इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी 50 पर्यंत पाढे पाठांतराचे अप्रतिम सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी कृती करत, फुगडी खेळत, वारकऱ्यांचे पाऊल खेळत टाळ्यांचा गजर करत, व्यायाम प्रकार करत, हलगी, डफ वाजवत, भन्नाट आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कृती करत करत चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले “जुगलबंदी पाढे ” पालक, शिक्षक मान्यवर व ग्रामस्थांसाठी एक ज्ञान मंदिरात मिळणारी ज्ञानमेजवानीच ठरली.
श्लोक शाहू लामकाने हा या वर्गातील एक कल्पक कवी याने स्वतः रचलेल्या कवितांचा एक संग्रह आहे त्यातील ' शेतकरी'या विषयावरील कविता आणि त्यातील शेतकऱ्याच्या पिकाला दिला पाहिजे भाव| म्हणजे शेतकरी घेणार नाही आत्महत्येचे नाव|| असे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर केलेले गहनभाष्य नऊ वर्षाच्या मुलाच्या अप्रतिम कल्पक विचारांच प्रतीकच होतं जणू. नवोदित "कल्पक कवी " म्हणून या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
चाहत महंमद इनामदार व ओमकार सचिन पवार या दोन विद्यार्थ्यांनी पन्नास पर्यंत पाढे जुगलबंदीने न अडखळता सादर करून स्मरणशक्तीचा अजब नजरा काय असतो याचा याची देही याची डोळा अनुभव करवीला. ओम बबन साळुंखे व शिवम दयानंद कुंभार या दोन विद्यार्थ्यांनी तर चक्क 30 पर्यंतचे पाढे ते ही उलट क्रमाने!! हा तर एक बुद्धी शक्तीचा अचंबाच उपस्थितांनी अनुभवला.
सोहम,राजवर्धन, श्लोक, चाहत, श्रेयस इयत्ता चौथीच्या वर्गातील या विद्यार्थ्यांनी 40 पर्यंत पाढे सह वाचले दहावी इंग्रजी चे पुस्तक वरद, श्रीहरी,आरव, सायली,योगेश्वरी, शिवंजली,सृष्टी, प्रियंका ,माऊली इत्यादींनीही ही जुगलबंदी अप्रतिम होती. या सर्व विद्यार्थ्यांना ' पाढेवीर' २०२२ -२३ किताब म्हणून शारदा प्रतिष्ठान च्या अध्यक्ष शारदा नन्नवरे व डॉ.प्रवीण नन्नवरे यांनी ट्रॉफी व प्रमाणपत्र, शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या शैलेश साठे यांच्या वतीने पुष्पगुच्छ ,मिठाई व शालेय वस्तू देवून गौरविण्यात आले. इयत्ता चौथीच्या वर्गाचा हा निरोप समारंभ! विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करताना हमसून हमसून रडत होते तर सर्व माता पालक दाटून आलेल्या कंठ , त्यास वाट मोकळी करून देताना हा प्रसंग जिल्हा परिषद शाळेचा लळा, शाळेविषयी आत्मीयते चे प्रतीक होते.
गावच्या सरपंच सौ अर्चनाताई नन्नवरे , शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार साहेब, उपसरपंच नारायण सर्वगोड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमशंकर घोंगडे,ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार साठे, ज्ञानेश्वर ननवरे बाळासाहेब ननवरे, संभाजी ननवरे , विशाल ताटे, प्रमोद चौरे सर्व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अर्चनाताई नन्नवरे , तसेच अकोलेकाटी गावच्या पालकांतर्फे मुलांच्या वर्ग शिक्षिका शीला नन्नवरे मॅडम यांचा गौरव करण्यात आला.
पाढे पाठांतर ची ही कला आणि इंग्रजी वाचनाचे कौशल्य मुलांना खूपच प्रगती पथावर नक्की नेईल असे विस्तार अधिकारी जमादार साहेब म्हणाले.
पत्रकार शिवाजी सुरवसे यांनी जी प शाळेतील विद्यार्थ्यांची ही गुणवत्ता भारताला एक नवी दिशा देणारी ठरेल असे प्रतिपादन केले. शारदा प्रतिष्ठान चे डॉ प्रवीण नन्नवरे यांनी शाळेची गुणवत्ता पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर विद्यार्थ्यांमध्ये अद म्य इच्छाशक्ती आहे तिला फक्त ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार दिशा दर्शन करण्याचा प्रयत्न केला असे वर्गशिक्षिका शीला नन्नवरे मॅडम म्हणाल्या. शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत शेरजाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर माने सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.