नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलंय. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आहे. नागपूर येथे सुरु असलेलं हिवाळी संपेपर्यंत त्यांचं निलंबन असेल. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबन करण्याचा ठराव माडंला होता.
विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सभागृहात संतापले होते. या संतापात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांनाअसंसदीय शब्द वापरला होता. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली होती. या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगितही करण्यात आले होते. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला.
जयंत पाटील यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य केलं. नागपुर अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांच्या वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असा ठराव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाचा त्याग केला.