हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजन : मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानाची पर्वणी.
सोलापूर – जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळ आणि सोलापूर जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान हुतात्मा स्मृती मंदिरात बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे व गणेशोत्सव समिति अध्यक्ष सुहास मुळजकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी ६.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहे. जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या व्याख्यानमालेचे हे ४९ वे वर्ष आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन बुधवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे असतील. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी बुधवारी दि. ३ सप्टेंबर रोजी मेजर जनरल राजेंद्र मेहता (चंदिगड) हे ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गणेश शिंदे आणि सन्मिता धापटे – शिंदे गुंफणार असून ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘मोगरा फुलला’ हा संगीतमय तीन तासांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी व्याख्यानमालेचा समारोप होणार असून यावेळी डॉ.
रश्मीनी कोपरकर ‘भारताचे परराष्ट्र धोरण संधी आणि आव्हाने ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
सोलापूरकरांनी या व्याख्यानमालेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष विनय दुनाखे यांनी केले.
या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे, जनता बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुहास मुळजकर, उपाध्यक्ष आनंद डिंगरे, सचिव कपिल सावंत, खजिनदार सुहास कमलापूरकर, व्याख्यानमाला समिती प्रमुख मदन मोरे, व बँकेचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, संचालक प्राचार्य गजानन धरणे, वरदराज बंग, जगदीश भुतडा, चंद्रिका चौहान, गिरीश बोरगावकर, राजेश पवार, पुरुषोत्तम उडता, ऍड. अमोल कळके, गौरी आमडेकर, अजितकुमार देशपांडे, सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, देवदत्त पटवर्धन, मकरंद जोशी, सहाय्यक सरव्यवस्थापक तुलसीदास गज्जम, रामदास सिद्धूल, रमेश मामडयाल, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुधांशू रानडे व बँकेचे अधिकारी व कर्मचारी व गणेशोत्सव समिती प्रमुख सुहास कमलापुरकर, दगडू साळुंके, सिद्धार्थ गंगुडा, पूनम बोडा, गणेश कणबसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.