प्रिसिजन सामाजिक पुरस्काराने तुळजाई प्रतिष्ठान आणि रॉबिनहूड आर्मीचा सन्मान
सोलापूर दि. २३ : स्पर्शामध्ये, संवादामध्ये जादू असते. भारतासारख्या देशात हजारो बालकं बिनास्पर्शाची, संवादहीन वातावरणात वाढतात. या अनाथांना आपल्या अनाथपणातून ‘बिचारेपण’ येऊ नये ही समाजाची जबाबदारी आहे, असे उद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर यांनी ‘प्रिसिजन गप्पां’मध्ये काढले.
प्रिसिजन गप्पांच्या १३ व्या पर्वाच्या दुसऱ्या दिवशी ‘प्रिसिजन सामाजिक पुरस्कारां’चे वितरण रेणूताईंच्या हस्ते झाले. यावेळी प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. यतिन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, कंपनीचे संचालक तथा मुख्य वित्तीय अधिकारी श्री. रविंद्र जोशी, कार्यकारी संचालक श्री. करण शहा हे उपस्थित होते.
मतीमंद मुलींना ‘स्वआधार’ देत मायेचं पांघरूण घालणाऱ्या तुळजाई प्रतिष्ठान (उस्मानाबाद) या संस्थेला २०२१ सालचा ‘प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि रुपये तीन लाख अशा स्वरूपाचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने श्री. शहाजी चव्हाण यांनी स्वीकारला.
तसंच दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या लोकांपर्यंत भोजन पोहोचवून सातत्यपूर्ण अन्नसेवा करणाऱ्या रॉबिनहूड आर्मीला (सोलापूर) २०२१ सालचा ‘स्व. सुभाष रावजी शहा स्मृति पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं. सन्मानचिन्ह आणि रुपये दोन लाख अशा स्वरूपाचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने श्री. हिंदुराव गोरे यांनी स्वीकारला.
रॉबिनहूड आर्मी आर्थिक मदत किंवा देणगी स्वीकारत नसल्याने पुरस्काराची रक्कम रॉबिनहूड आर्मीच्या उपक्रमांसाठी भोजन व्यवस्था करणाऱ्या अनिता उबाळे यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. पुरस्कार वितरणापूर्वी दोन्ही संस्थांचा माहितीपट दाखविण्यात आला. डॉ. शहा यांनी प्रिसिजन फाउंडेशनच्या वाटचालीचा तसेच राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. पुरस्कार वितरणानंतर मिलिंद वेर्लेकर यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून रेणूताईंची वाटचाल उलगडली.
पंचविशीत असताना आईवडील निवर्तल्यानंतर मला एकटेपणा जाणवायला लागला. तारुण्यात असून आणि संसारसुख मिळत असतानाही आपल्याला एकाकी वाटत असेल तर ज्यांचं बालपणी छत्र हरपलं त्यांचं काय होत असेल या विचाराने मी अस्वस्थ झाले. मुंबईतल्या माटुंगाजवळच्या रिमांड होममध्ये कोंडलेली मुलं मला जातायेता दिसायची. वयाच्या २५ व्या वर्षी या मुलांशी सुरू झालेला संवाद पुढची ४० वर्षे टिकून राहिला आहे. डेव्हिड ससून रिमांड होममधल्या मुलांनी गोष्ट सांगायचा आग्रह केला आणि माझ्यातील स्टोरीटेलरचा जन्म झाला. आतापर्यंतच्या जीवनप्रवासात हजारो मुलांशी गोष्टींच्या माध्यमातून संवाद साधता आल्याचा आनंद आहे. गोष्टी सांगून त्यांना प्रेम देण्याचा मी प्रयत्न केला. माझ्यातल्या स्टोरीटेलरने रिमांड होममधल्या मुलांचा विश्वास जिंकला याचंही समाधान आहे, असं रेणूताई म्हणाल्या.

तुळजाई प्रतिष्ठानच्या ‘स्वआधार’ प्रकल्पात १०८ मतिमंद मुली आहेत. या मुलींना सुरक्षित वातावरण आणि हक्काची भाजीभाकरी देत आहोत. मेंदूवर नियंत्रण नसलेले पण मनाने निर्मळ असे हे सृजनशील जीव आहेत. समाजानेही या मुलींवर आपल्या परीने मायेची ओंजळ धरावी.शहाजी चव्हाण (संस्थापक, तुळजाई प्रतिष्ठान, उस्मानाबाद)
सोलापूरात कोणीही उपाशीपोटी झोपू नये याच एकमेव विचाराने रॉबिनहूड आर्मीची सोलापूर शाखा कार्यरत आहे. रॉबिन्स हे सर्वसामान्य घरातील तरुण आहेत. अन्नाची नासाडी रोखून रॉबिन्समार्फ़त ते भुकेलेल्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करू. हिंदुराव गोरे (रॉबिनहूड आर्मी, सोलापूर)
हृदयी वसंत फुलताना..!
‘प्रिसिजन गप्पां’मध्ये रविवारी (दि. २४) ‘हृदयी वसंत फुलताना..!’ हा भन्नाट कार्यक्रम सादर होणार आहे. सिनेरसिकांच्या हृदयात वसंत फुलवणाऱ्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याशी हृषिकेश जोशी संवाद साधतील. ऑनस्क्रीन दिसणाऱ्या या जोडप्याचं ऑफस्क्रीन सहजीवन आणि रुपेरी पडद्याच्या दुनियेतील अफलातून किस्से रसिकांसाठी पर्वणी ठरतील.