सोलापूर – देशाच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महात्मा फुले यांच्या आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील शेती आणि शिक्षणाचे धोरण राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्यावतीने महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर: शेती, शैक्षणीक धोरण व त्यांची समकालीन प्रस्तुतता या विषयावर आयोजित राज्यस्तरीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी बेडकिहाळ हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र- कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, समन्वयक प्रा. डॉ. गौतम कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी बेडकिहाळ म्हणाले, शेतकरी आणि बहुजन वर्गाचे शत्रू अज्ञान आहे. आमच्या अनेक पिढ्या अज्ञानामुळे विकासापासून कोसो दूर राहिले आहेत. फुलेनीं शेतकऱ्यांच्या दुःख, दारिद्र्य संपविण्यासाठी “शिक्षण घेणे” हाच एकमेव मार्ग सांगितला. शेतकरी ज्ञानी झाल्याशिवाय त्याला त्याच्या दुःखाचे, गरिबीचे मूळ कारण सापडणार नाही. म्हणून त्यांनी इंग्रज सरकारला पत्र पाठवून बहुजन समाजाला शिक्षण देण्याची मागणी केली. शेतकरी वर्गाने शिक्षण घेऊन आधुनिक शेती, जलसिंचन, पाणी आडवा -पाणी जिरवा, धरणे, कालवे -पाटचाऱ्या निर्माण करून बारमाही पाणी शेतीस देऊन उत्पन्न वाढविण्याचे मार्ग निर्माण केले पाहिजे. सोबतच गावाजवळ शेतकऱ्यांच्या बाजारपेठ, शेती मालावर प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजे. तरच शेतकरी आत्महत्या व बेरोजगारी थांबणार आहे, असे बेडकिहाळ म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी केले यावेळी प्र- कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, राजाभाऊ सरवदे यांनीही मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात डॉ. उमेश बगाडे यांनी मांडणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर शेवटी प्रा. एच. ए. शेख यांनी आभार व्यक्त केले.