महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. राज्यपालपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी अनेक महापुरुषांबाबत वादग्रस्त विधाने करुन वाद ओढवून घेतले आहेत. भाजप वगळता त्यांच्या राजीनाम्याची मागणी विविध पक्ष, संघटनांनी केली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राज्यपाल बदलाच्या चर्चेनं सध्या जोर धरला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा पवारांनी खोचक शब्दात राज्यपालांना टोला लगावला.
“राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होत आहे ही चांगली गोष्ट आहे,” असे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
याबाबत पवारांना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता. पवार म्हणाले, “महाराष्ट्रात कोण राज्यपाल येणार हे माहित नाही. मात्र, आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ही चांगली गोष्ट आहे.
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील, असे इंडिया टूडे –सी वोटर ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात समोर आले आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
कर्नाटकमध्ये भाजप सरकार राहील की नाही अशी चिन्हे आहेत. त्यामुळे विरोधकांची एकी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, अजूनही कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या असून त्या पहिल्यांदा सोडवाव्या लागतील. विरोधकांच्या समन्वयाबाबत दिल्लीमध्ये चर्चा सुरू होईल,”
“वंचित बहुजन आघाडीची ठाकरेंच्या शिवसेनेशी युती झाली आहे. वंचितसोबत आघाडीचा प्रस्ताव आमचा नाही, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही,” ‘ठाकरे गट आणि वंचित यांच्यात वाद आहे का मला माहित नाही,” असे पवार म्हणाले.