पंढरपूर : आयोध्येतील राममंदिर उद्घाटनप्रसंगी पंढरपूरमधील अनेकांना निमंत्रण मिळाले असून, वारकरी संप्रदाय आणि संत विभूती या सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत. राममंदिराचा लढा गेले कित्येक वर्षे चालल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होत असताना, या सोहळ्याला वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बडवे समाजातील थोर संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज, रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात, देवाचे सेवाधारी आणि ज्याच्याघरी 400 वर्षांपासून पांडुरंगाच्या पादुका असणारे हरिदास अशा मान्यवरांना राम मंदिर केंद्रीय समितीकडून उदघाटन सोहळ्यासाठी निमंत्रण प्राप्त झाले आहे.
22 जानेवारीला नियोजित या भव्य दिव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून, निमंत्रितामध्ये कलाकार, कवी, उद्योगपती, डॉक्टर, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, राममंदिर संघर्षात प्राण गमावलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
पांडुरंगाचे परंपरागत प्रमुख पुजारी म्हणून बडवे यांच्यासह सेवेधारी मंडळी पैकी पांडुरंगाच्या पादुका असणाऱ्या काल्याच्या वाड्यातील मदन महाराज हरिदास यांच्याबरोबर रूक्मिणीचे वंशपरंपरागत पुजारी उत्पात यांनाही खास निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्रची थोर संत व वारकरी संप्रदायाचे महत्व जाणून महान संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या वंशज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विश्वस्त वासकर महाराजांबरोबर, देगलूरकर महाराज व इतर महत्त्वाचे परंपरा जोपासणाऱ्या साधुसंतांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.