सोलापूर : रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालय, दमानी नगर येथे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला उत्साहात “महिला दिन” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विशाखा मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना विशाखा मराठे म्हणाल्या, “आपण समाजाकडून जसे घेतो तसे समाजाला देता देखील आले पाहिजे. समाजाचे ऋणी व्हायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या परीने समाजासाठी योगदान देणे आवश्यक आहे.” त्यांनी आपल्या मनोगतातून समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच सुप्रसिद्ध उद्योजिका व लेखिका सुधा मूर्ती यांच्या कार्याचे उदाहरण देत महिला दिनाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांना गोष्टीरूपात समजावून सांगितला. महिला दिन हा महिलांचा सन्मान करण्याचा दिवस असला तरी स्त्री आणि पुरुष दोघेही समाजाच्या प्रगतीसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत, असेही त्या म्हणाल्या. या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिलांच्या व्यक्तिरेखा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे आणि शाळेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेचे विश्वस्त चारूकीर्ती शिरसोडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सौ. विशाखा मराठे यांचे स्वागत केले. तसेच शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुण्या विशाखा मराठे यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ आणून त्याचेही वाटप केले. या कार्यक्रमास शाळेचे सचिव सुनील दावडा, विश्वस्त चारूकीर्ती शिरसोडे, रोटे संजय चौगुले, आसावरी सराफ, रेणुका पसपूले, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, योगिता बोधले, अश्विनी ढोणे, सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे, शकलेन बडे खान, आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेनुरे, साहेबगौड पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शबाना शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक नागनाथ बसाते यांनी केले तर आभार सचिव सुनील दावडा यांनी मानले.


