येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चा दरम्यान भाई जगताप यांनी धक्काबुक्की केली असल्याचे सांगत आणखी धक्कादायक आरोप आमदार सुद्धिकी यांनी केले आहे. या पत्रामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे.
मुंबई काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारविरोधात आक्रोश मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चादरम्यानच भाई जगताप आणि झिशान सिद्धिकी यांच्यातील वाद दिसून आला होता. आमदार झिशान सिद्धिकी यांनी भाई जगताप यांनी आपल्याला वाईट वागणूक देत धक्काबुक्की केली. त्याशिवाय, त्यांनी माझ्या बद्दल आणि समुदायाबाबत अपमानजनक शब्दांचा वापर केला असल्याचा आरोप झिशान सिद्धिकी यांनी केला. भाई जगताप यांच्या वर्तवणुकीमुळे कार्यकर्ते संतापले होते. भाई जगताप यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी झिशान सिद्धिकी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.