औरंगाबाद : आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे ऐन काढणीच्या टप्प्यात असलेला उडीद पाण्यात आहे. तर ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी कायम आहेत.मराठवाड्यात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. शेतकऱ्यांनी कापूस पिकाला फाटा देत सोयाबीन या नगदी पिकाला पसंती दिली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले आहे.
पेरणीच्या वेळी पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे वेळेत पेरण्या झाल्या नाहीत तर खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग ही पिके जोमात असतानाच मराठाड्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे सोयाबीनवर करपा, ऊंट आळीचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम हा होणार आहे. वेळोवेळी फवारणी करुनही पिकांवरील रोगराई ही कायम आहे. तर दुसरीकडे ऐन काढणीच्या प्रसंगी उडीद पिक पाण्यात आहे.उस्माबाद, लातूर, बीड जिल्ह्यात उडिदाची काढणी सुरू आहे. अनिश्चित पावसामुळे उडीद काळवंडला जात आहे. त्याचा परिणाम हा बाजारपेठीतील दरावर होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने मराठवाड्यात हजेरी लावलेली आहे. मंगळवारी मराठवाड्यातील 67 मंडळात अतिवृष्टी झाली होती.खरीप हंगामातील पिकाच्या अनुशंगाने ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे अशा शेलकऱ्यांनाही नुकसानीनंतर अवघ्या 72 तासाच्या आतमध्ये ऑनलाईन नोंद करणे आवश्यक राहणार आहे. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना नोंदी करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
कांदा, फळपिकांचेही नुकसान
उडिदाचे रिकामे झालेल्या क्षेत्रात कांद्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टीने नु्कसान झाले आहे. तर लातूर जिल्ह्यात पावसामुळे द्राक्ष फळपिकांचे नुकसान झाले आहे.दरवर्षी शेतकऱ्यांच्या पदरी पिक पडताच दर घसरलेले असतात. यंदा शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. पावसामुळे उडिद काळवंडला आहे. त्यामुळे 8 हजार क्विंटलवरील दर थेट 6 हजारावर आले आहेत.