अर्थ व सांख्यिकी सहसंचालक -हणमंत माळी
सोलापूर;- सोलापूर जिल्हयाचे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२३ चे प्रकाशन वेळेत प्रकाशित होण्याकरिता संबंधित सर्व कार्यालयांनी 15 मे पर्यंत माहिती उपलब्ध करुन द्यावी असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे सहसंचालक हणमंत माळी यांनी केले आहे.
जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२३ बाबत कार्यान्वयन यंत्रणांची आढावा बैठक जिल्हा नियोजन भवन येथे घेण्यात आली. बैठकीस नियोजनचे उपआयुक्त संजय कोलगणे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, जिल्हा व सांख्यिकी विभागाचे उपसंचालक दिनकर बंडगर तसेच संबधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलीक गोडसे उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन शासकीय आकडेवारीचा मुख्यस्त्रोत आहे. यामध्ये विविध कार्यालयांची विकासात्मक आकडेवारी प्रकाशित केली जाते. जिल्हा स्तरावरील समाजिक व आर्थिक निर्देशांकांबाबतची तालुकानिहाय माहिती यात दर्शविण्यात येते. विविध योजनांसाठी तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, संशोधक विदयार्थी आदींना या माहितीचा उपयोग होतो. यावेळी जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२३ या प्रकाशनाचे स्वरुप, महत्व, त्याची उपयुक्तता याबाबतही विस्तृत माहिती सहसंचालक हणमंत माळी यांनी दिली.
प्रत्येक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व त्यातूनच संपुर्ण महाराष्ट्र राज्याचा विकास करण्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करावयाचा आहे. तरी या नवीन विषयाची सर्व संबधित यंत्रणांना ओळख करुन देणे, शासनाच्या सुचना, आपेक्षा, भविष्यात करावयाच्या कार्यवाहीची दिशा ठरविणे आदींची माहिती देण्याकरीता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर विविध समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.