येस न्युज मराठी नेटवर्क : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकाऱ्यांना देशानं गमावलं. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. त्यांच्या तपासात आता मोठा खुलासा झाला आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकारी असलेलं हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. हेलिकॉप्टर खराब हवामानामुळं क्रॅश झाल्याचं समितीच्या चौकशीतून समोर आलं आहे.
दरम्यान, वायुसेनेच्या वतीनं अहवालाबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही. परंतु, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर क्रॅशच्या कारणांचा तपास करत असलेल्या कमिटीनं अहवालात म्हटलंय की, खराब हवामानामुळे वैमानिक ‘विचलित’ झाले असावेत, ज्यामुळे हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला CFIT म्हणजेच ‘Controlled Flight Into Terrain’ म्हणतात. हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयानं अपघाताचं कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.