नवी दिल्ली : इंधन आणि खाद्यान्न श्रेणीतील वस्तुंच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातील सर्वसाधारण महागाई निर्देशांक १४.५५ टक्क्यांवर गेला आहे. महागाई दराचा हा गेल्या चार महिन्यातील उच्चांकी स्तर आहे. महागाईमुळे बहुतांश वस्तुंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. महागाईमुळे होत असलेली होरपळ कधी थांबणार? असाच सवाल सध्या जनतेमधून केला जात आहे.
सरत्या फेब्रुवारी महिन्यात डब्ल्यूपीआय निर्देशांक १३.११ टक्के इतका होता. तर मार्च महिन्यात हा निर्देशांक (Inflation index) वाढून १४.५५ टक्क्यांवर गेला आहे. सलग बाराव्या महिन्यात महागाई निर्देशांक १० टक्क्यांच्या पुढे राहिलेला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या मार्च महिन्यात हा निर्देशांक ७.८९ टक्के इतका होता. अलिकडेच केंद्र सरकारकडून किरकोळ महागाई निर्देशांकाचे आकडे जाहीर करण्यात आले होते. हा निर्देशांकही १७ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर म्हणजे ६.९५ टक्क्यांवर नोंदविला गेला होता. दिवसेंदिवस महागाई वाढतच असल्याने सरकार, रिझर्व्ह बँकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. सरत्या मार्च महिन्यात सर्वच श्रेणीतील वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे.