सोलापूर : राज्यातील ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यातील दिग्गज नेत्यांची स्थानिक पातळीवर प्रतिष्ठा यात पणाला लागली असून आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीमधील चढाओढ यात पाहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यात निळवंडे ग्रामपंयाचत निवडणुकीत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या सरंपचपदी निवडून आल्या आहेत.
शशिकला पवार यांनी निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यात गावकऱ्यांनी विश्वास दाखवत शशिकला यांना विजयी केलं आहे. इंदोरीकर महाराजांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी होत असते. विनोदी शैलीनं आणि उदाहरणांनी प्रवचनातून समाजप्रबोधन करण्याची इंदोरीकर महाजारांची पद्धत अनोखी आहे. राज्यात विविध गावांमध्ये त्यांची दररोज प्रवचनं होत असतात आणि त्याला लोकांची चांगली पसंती देखील मिळते. आता इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई यांनी राजकारणात एन्ट्री घेतली असून त्यांच्या पुढील कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.