येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय पिस्तूल नेमबाजी संघाच्या प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे (वय ४१) यांचे गुरुवारी सकाळी अकराला नाशिकरोडच्या सुजाता बिर्ला रुग्णालयात कोरोनाने निधन झाले. तत्पूर्वी त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे निवृत्त कर्मचारी मनोहर (बापू) गोऱ्हे (वय ८०) यांचे बुधवारी रात्री करोनाने निधन झाले. वडिलांपाठोपाठ मुलीचे निधन झाल्याने क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. पिता व लेकीवर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोनाली यांच्या मागे आई, बहीण, मेहुणे, भाचे असा परिवार आहे. करोनातून मुक्त झाल्यानंतर मोनाली यांच्या छातीत संसर्ग निर्माण झाल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या निधनानंतर नाशिकमधील नेमबाजी खेळाची धुरा मोनाली गोऱ्हे यांनी सांभाळली होती. पंधरा दिवसांपूर्वी मोनाली यांच्या वडिलांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर मोनाली गोऱ्हे यादेखील करोना बाधित झाल्या होत्या. त्यांच्यावर नाशिकरोडच्या सुजाता बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी रात्री उपचार सुरू असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पाठोपाठ मोनाली गोऱ्हे यांचेही निधन झाले. मोनाली गोऱ्हे यांनी नेमबाजी हा खेळ रुजवला व वाढवला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणून काम करून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. गेल्या चार वर्षांपासून त्या भारतीय पिस्तुल नेमबाजी संघ्याच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत होत्या. एक्सेल टार्गेट शूटिंग असोसिएशनच्या मुख्य प्रशिक्षक, विनर्स शूटिंग क्लबच्या संस्थापक, नाशिक जिल्हा नेमबाजी संघटनेच्या संस्थापक व सचिव, महाराष्ट्र राज्य नेमबाजी असोसिएशनच्या सदस्या म्हणून त्या काम पाहत होत्या. जागतिक स्तरावर झालेल्या नेमबाजी स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.