सोलापूर विद्यापीठात लाभसेटवार व्याख्यानमाला संपन्न
सोलापूर – भारतीय शिक्षणपद्धतीला हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली असून बालवयापासून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, संस्कृती आणि ज्ञानाची बीजे रोवणारी आहे. कुटुंबवत्सल्यावर आधारित ही शिक्षणप्रणाली अनुभवातून शिकवण देणारी असून तिचा जगभर डंका आहे, असे प्रतिपादन बृहमहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथील प्राध्यापक डॉ. प्रशांत साठे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ. अनंत व डॉ. लता चारिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित लाभसेटवार व्याख्यानमालेत ते बोलत होते. “शैक्षणिक धोरण आणि महाराष्ट्रातील सद्यस्थिती” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे होते. यावेळी ट्रस्टचे संस्थापक डॉ. अनंत लाभसेटवार व डॉ. लता लाभसेटवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले.

डॉ. साठे यांनी सांगितले की, भारतात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख कौशल्ये व प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त होणार आहे. डिजिटल युगात ऑनलाइन संशोधन उपयुक्त असले तरी त्यावर अति अवलंबून राहणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय शिक्षणपद्धती ही अनुभवाधारित असून समाजोपयोगी संशोधनावर अधिक भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी स्वीकारली आहे. मात्र काही राज्यांमध्ये अद्याप या धोरणाबाबत पुरेशी माहिती नाही. एकसंध भारतासाठी संपूर्ण देशात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, डॉ. अनिल घनवट, डॉ. विकास कडू, तसेच दत्ता पुकाळे, ओम इंगळे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार डॉ. ज्ञानेश्वरी हजारे यांनी मानले.

