येस न्युज मराठी नेटवर्क (नवी दिल्ली) : भारतातील कोरोना संकटाची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. याशिवाय बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. दुसरीकडे सरकारची कोरोना लसीकरण मोहिम, या सर्व कारणांमुळे भारताची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचं दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत कोरोना लसीच्या लसीकरण्याच्या मोहिमेवर भाष्य केलं आहे. “भारतात जलद गतीने कोरोना लसीकरण अभियान सुरु आहे. आतापर्यंत एकूण 25 लाख लोकांना लस टोचण्यात आली आहे”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली आहे.
“आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार आज दुपारी दोन वाजता 25 लाख पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लस टोचली गेली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. देशात सध्या 1 लाख 75 हजार कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. भारतात सर्वात वेगाने 10 लाख लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे”, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले आहेत.
कोरोनाची लस टोचल्यानंतर आतापर्यंत 16 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे प्रमाण एकूण लोकांच्या 0.0007 टक्के इतकं आहे. आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकाही व्यक्तीचा मृत्यू कोरोनाची लस टोचल्याने झालेला नाही. याशिवाय कोरोना लसीचा कोणताही गंभीर परिणाम आढळलेला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने याआधी दिली आहे