येस न्युज मराठी नेटवर्क : कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजाच्या धमाकेदार खेळीच्या बळावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर 303 धावांचं आव्हान ठेवलं आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक नाबाद 92 तर जाडेजानं नाबाद 66 धावांची धडाकेबाज खेळी केली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 150 धावांची भागिदारी करत संघाला तीनशेचा पल्ला गाठून दिला.
मयांक अग्रवालच्या अनुपस्थितीत शुभमन गिल शिखर धवनच्या सोबतीला सलामीसाठी आला. शिखर धवन शेन अबॉटच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटने गिलच्या साथीने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. गिलने यादरम्यान काही सुरेख फटके खेळले. फिरकीपटू अॅगरने गिलला माघारी धाडत भारताला मोठा धक्का दिला. शुभमन 33 धावांवर बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर (19)आणि लोकेश राहुलही (5) स्वस्तात माघारी परतले.
एकीकडे विकेट पडत असताना विराट कोहलीने आपलं अर्धशतक झळकावलं. मात्र तो 63 धावांवर बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला. मात्र हार्दिक पांड्याने विराट बाद झाल्यानंतर आलेल्या जाडेजाच्या साथीने भारताला तीनशेचा पल्ला गाठून दिला. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅगरने 2 तर हेजलवूड-झॅम्पा आणि अबॉटने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.