नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असते. भारतीय आणि पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दीर्घ कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. आयसीसी टी – 20 विश्वचषक स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ही लीग सुरू झाल्यानंतर काही काहीच दिवसात भारत-पाकिस्तान एकमेकांसमोर भिडणार आहेत. 24 ऑक्टोबर रोजी दुबईत हा सामना रंगणार आहे. विविध कारणांमुळे भारत-पाकिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून द्विपक्षीय सामने खेळवले गेले नाहीत.
पण आता टी20 वर्ल्डकपमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याकडे भारत-पाकिस्तानमधील चाहत्यांसह संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिले आहे.ही स्पर्धा यावर्षी भारतात होणार होती, मात्र भारतातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे टी-20 विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमान मध्ये होणार आहे. या लीगमधील सामने दुबई, अबूधाबी, शारजाह आणि ओमानमध्ये होणार आहेत. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत.भारत आणि पाकिस्तानहे पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा एका वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने असणार आहेत. आयसीसीने केलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुपच्या घोषणेनुसार, दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश करण्यात आला आहे.टी-20 वर्ल्ड कपला सुरू व्हायच्या आधी काही टीमना क्वालिफायर राऊंड खेळावा लागणार आहे. क्वालिफायर राऊंडमध्ये ग्रुप-ए आणि ग्रुप-बी अशी विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप-एमध्ये श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स आणि नामिबिया यांचा समावेश आहे. तर ग्रुप बीमध्ये बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी आणि ओमान या टीम आहेत. या दोन्ही ग्रुपमधल्या प्रत्येकी दोन-दोन टीम वर्ल्ड कपला क्वालिफाय होतील.
ग्रुप -1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांच्यासह ग्रुप-एचा विजेता आणि ग्रुप-बीचा उपविजेता संघ असेल.
ग्रुप-2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ग्रुप एचा उपविजेता आणि ग्रुप बीचा विजेता असेल.