ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने 7 आणि 8 मे2025 च्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियाना भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशननं विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केलेला.
भारतीय लष्कराने कोणती माहिती दिली ?
ऑपरेशन सिंदूर संदर्भात 7 मे 2025 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईला केवळ लक्ष्य केंद्रीत, मोजकी आणि तणाव न वाढवणारी अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते. पाकिस्तानातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेले नाही, हेही ठामपणे सांगण्यात आले होते. भारतातील लष्करी ठिकाणांवर कोणताही हल्ला झाल्यास त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, हेही पुन्हा अधोरेखित करण्यात आले.
पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न-
७ आणि ८ मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानने अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फाळोदी, उत्तरलाई आणि भुज यांसारख्या उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या सर्व हल्ल्यांना इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने यशस्वीरित्या निष्प्रभ केले. या हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणी सापडले असून, पाकिस्तानी हल्ल्याचा पुरावा म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील एअर डिफेन्स रडार टार्गेटवर-
आज सकाळी भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील एअर डिफेन्स रडार आणि सिस्टम वर टार्गेट हल्ले केले. पाकिस्तानच्या कारवाईच्या समान क्षेत्रात आणि तीव्रतेतच भारताने प्रत्युत्तर दिले आहे. लाहोरमधील एक एअर डिफेन्स सिस्टम निष्क्रिय करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, मेंढर आणि राजौरी या जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील भागांमध्ये मोर्तार आणि जड तोफखाना वापरून बिनप्रवोक हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. या हल्ल्यांमुळे १६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. या परिस्थितीत पाकिस्तानचा मोर्तार आणि तोफगोळ्यांचा मारा थांबवण्यासाठी भारताला कारवाई करावी लागली. भारतीय सैन्य तणाव वाढवण्याच्या विरोधात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करते, परंतु ही भूमिका पाकिस्तानच्या लष्करानेही पाळली पाहिजे.
एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय, नेमकी काम कशी करते?
HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशननं विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केलेला. याची रेंज 125 ते 200 किलोमीटर असल्याचं सांगितलं जातंय. त्यात एकाच वेळी 100 लक्ष्यांचा मागोवा घेण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान खूपच चिंतेत पडलं होतं. त्यामुळे त्यांनी तात्काळ HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला. भारताची राफेल लढाऊ विमानं, सुखोई एसयू-30 एमकेआय आणि ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ही पाकिस्तानसाठी मोठी आव्हानं ठरणार आहेत. त्यामुळेच पाकिस्ताननं HQ-9 सारख्या क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पण, आता भारतानं ड्रोनमार्फत पाकिस्तानची HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली उद्ध्वस्त केल्यामुळे आता पाकिस्तानची चिंता वाढली आहे. पाकिस्तानी लोक चीनच्या HQ-9 ची तुलना भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीशी करतात. पाकिस्तानी काहीही म्हणोत, पण सत्य हे आहे की, पाकिस्तानला चीनकडून मिळालेली HQ-9 एअर डिफेन्स सिस्टिम तांत्रिकदृष्ट्या S-400 समोर अजिबात टिकू शकत नाही. दोघांची तुलना करणंही वेळ वाया घालवण्यासारखं आहे. HQ-9 ची रडार प्रणाली भारताच्या ब्राह्मोस सारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकेल, याचा विचार करणंही अशक्य आहे. S-400 ची मारा करण्याची क्षमता 400 किलोमीटर आहे आणि ती खूप कमी वेळात कार्यान्वित होऊ शकते. त्या तुलनेत, HQ-9 तैनात करण्यासाठी फक्त अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो.