नवी दिल्ली : कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी आता जगभरात लसीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जगातील सुमारे 10 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे तीन कोटी 28 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. भारताचा या बाबतीत जगात पाचवा क्रमांक लागतोय.
ब्लूमबर्गच्या व्हॅक्सिन ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत करण्यात आलेले कोरोना लसीकरण हे जगातील एक तृतीयांश इतकं आहे. धक्कादायक म्हणजे जगातील सर्वाधिक गरीब असे 29 देश आहेत जिथे अद्याप कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकली नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात आकडेवारी काढली तर इस्त्रायलमध्ये सर्वाधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. इस्त्रायलमध्ये आता पर्यंत 37 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये अनेक लोकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे.