सोलापूर लोकसभा निवडणुकीत माकपने इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एनडीए सरकारच्या पापाचा घडा भरला असून त्यांना सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येत काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत माकप नेते नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदे यांना लाखोंच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला.
इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी (५ एप्रिल ) सोलापुरातील दत्त नगर येथे माकप कार्यालयात जाऊन कामगार नेते आडम मास्तर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. यावेळी प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारच्या फसव्या आश्वासनावर सडकून टीका केली. भाजपने नोटबंदी, कोरोना काळात कामगारांचे अतोनात हाल केले असल्याचा आरोप केला. तसेच रे नगर या गृह प्रकल्पाचे श्रेय देखील लाटण्याचा ते लोक प्रयत्न करत असल्याचीही टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली. तसेच सोलापूरच्या विकासासाठी ही निवडणूक लढवायची असून माकपने पाठिंबा दिला यासाठी प्रणिती शिंदे यांनी नरसय्या आ आणि माकपचे आभार मानले.
आपल्यापुढे राक्षस उभा आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 ला सत्तेत आल्यापासून त्यांनी कामगार, शेतकरी आणि दलितांवर हल्ले चढवले. देशाची घटना बदलण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे. देशात दडपशाही सुरू झालेल्या पत्रकार विचारवंत तुरुंगात डांबले जात आहेत. संविधानात होत असलेले बदल सर्वसामान्य दिसू लागले आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, आपसात भांडलो तर आपल्यापुढे राक्षस उभा आहे, तो राक्षस सर्वांना खाऊन टाकेल, अशी घणाघाती टीका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता आडम मास्तरांनी यावेळी केली.
या भेटी प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोबत काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, अशोक निंबर्गी, विनोद भोसले, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला तर माकपचे नेते पक्षाचे सेक्रेटरी एम एच शेख , सिध्दप्पा कलशेट्टी, तुमच्या म्हेत्रे, माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, सनी शेट्टी, अशोक बल्ला, दिपक निकंबे व पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांच्या पापाचा घडा भरला, जायची वेळ सुरू झाली
यावेळी बोलताना अडमास्तर यांनी नरेंद्र मोदी सरकारवर सडकुन टीका केली. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांच्या खिशातून 35 लाख कोटी रुपये गरिबांच्या खिशातून काढले आणि ते अदानी, अंबानीला दिले. खूप उदाहरणे आहेत. त्यामुळे आता त्यांच्या पापाचा घडा भरला असून त्यांची जायची वेळ आली आहे. एनडीए यावेळेस 400 पार जागा जाणार असल्याचं मोदी सरकारकडून प्रचार केला जातो मात्र ते 200 च्या पुढे जाणार नसल्याचा निष्कर्ष व्यक्त करत आडम मास्तर यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राजीव गांधी आवास योजनेवर बोलत असताना आडम मास्तर म्हणाले की या योजनेत मनमोहन सिंग यांचे सरकार असताना साडेचार लाख रुपये अनुदान होते. केंद्र सरकारने ते अडीच लाखांवर आणले ती सबसिडी का कमी केली? असा सवाल त्यांनी मोदींना केला. एवढेच नाही तर या देशात 75 लाख ज्येष्ठ नागरिक पेन्शन 95 योजनेअंतर्गत नोंदी झालेली आहेत.मात्र सरकारकडून त्यांना केवळ एक हजार रुपये पेन्शन दिली जात आहे.
पेन्शन योजने संदर्भात मनमोहन सिंग सरकारच्या काळात कोश्यारी कमिटी नेमण्यात आली होती. त्या कोश्यारी कमिटीचा अहवाल नरेंद्र मोदी यांच्याकडे येऊन आठ वर्षे झाली. मात्र अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. एकीकडे पेन्शन पोटी पंधरा लाख कोटी रुपये तिजोरीत पडून आहेत. त्यावर येणारे व्याज विचारात घेता 10 हजार रुपये पेन्शन दिली पाहिजे. मात्र मोदी सरकार पीएफ मधील रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवत असल्याचा आरोप देखील आडम यांनी यावेळी केला. तसेच राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान नक्की होतील. मात्र तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन दहा हजार रुपये करावी लागेल.तरच तुम्ही तुमच्या शब्दाला जागले असे होईल, अशी भावनाही मास्तरांनी यावेळी व्यक्त केली.
ताई तुम्ही एक्सप्रेस पुढे जा, आम्ही सुपरफास्ट कामाला लागतो
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना माकपचा पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट करताना आडम मास्तर म्हणाले की, एकदा लढायचं म्हटलं की मनापासून लढायचं जीव इकडे आणि शरीर तिकडं असे होऊ देणार नाही. प्रणिती ताई तुम्ही एक्सप्रेस पुढे जा आम्ही सुपरफास्ट कामाला लागतो, असे आश्वासनही यावेळी मागे पण येते आडम मास्तर यांनी दिले. यावेळी माकपचा मेळावा आयोजित करून हजारो मतदारांपुढे जाहीर पाठिंबा देतो. तसेच अर्ज भरताना जेवढे काँग्रेसचे झेंडे असतील तेवढेच लाल झेंडे घेऊन माकपदेखील त्यामध्ये सहभागी होईल, हा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माकपकडून इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.