जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला. माजी नगरसेवक तथा संस्थेचे उपाध्यक्ष देवेंद्र दादा कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सैनिक नायब सुभेदार आप्पासो बुरांगे, रमाकांत जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शाळेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष देवेंद्र दादा कोठे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी वाढदिवस असलेले प्रशालेचे मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर सर यांचा शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील काही विद्यार्थ्यांचा देखील वाढदिवसानिमित्त गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन व नृत्य सादर केले. पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक आदरणीय स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या जयंती सप्ताह निमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे नायब सुभेदार आप्पासो बुरांगे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना माजी सैनिक रमाकांत जाधव यांनी आपण सर्वजण देशाचे सैनिक आहोत. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा करणे हीच खरी देशसेवा आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर सर यांनी केले, पाहुण्यांचा परिचय बिभीषण सिरसट सर यांनी करून दिला, सूत्रसंचालन गोपीचंद राठोड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मॅडम यांनी केले.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मॅडम, शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सुरवसे मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक नागेशकुमार काटकर सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व बहुसंख्य पालकांची उपस्थिती होती.