येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३२९ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या पाच बळींच्या जोरावर भारताने इंग्लंडला पहिल्या डावात १३४ धावांवरच रोखलं. इंग्लंडचा नवखा बेन फोक्स याने एकाकी झुंज देत नाबाद ४२ धावा केल्या. पण इतर कोणत्याही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. पहिल्या डावाअखेर भारताला १९५ धावांची आघाडी मिळाली.
३३० धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय फिरकीपटूंपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. सलामीवीर रॉरी बर्न्स शून्यावर बाद झाला. पाठोपाठ डॉम सिबली (१६) आणि डॅन लॉरेन्स (९) दोघांना अश्विनने बाद केले. आपली पहिली कसोटी खेळणाऱ्या अक्षर पटेलने तुफान फॉर्मात असलेल्या कर्णधार जो रूटला (६) स्वस्तात माघारी धाडले. बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या, पण त्यांनादेखील फार काळ खेळपट्टी सांभाळता आली नाही. मोईन अली(६), ओली स्टोन (१), जॅक लीच (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) हेदेखील स्वस्तात बाद झाले. नवोदित बेन फोक्सने नाबाद ४२ धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला १३४ धावांपर्यंत मजल मारता आली. अश्विनने ५, अक्षर पटेल आणि इशांत शर्माने २-२ तर मोहम्मद सिराजने १ बळी घेतला.