- सुरत-चेन्नई हा ग्रीन फिल्ड महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातून जात आहे. त्याच बरोबर केगाव ते तांदुळवाडी हा रिंग रोड होत आहे, या रस्त्यात शेतजमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळावा यासाठी सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड संघर्ष समिती तांदुळवाडी व केगाव नवीन बाह्य वळण रस्ता बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली.
- यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह संघर्ष समिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सभापती गोकुळ शिंदे, दिलीप जोशी, स्वामीनाथ हरवाळकर, महेश भोज, अमोल वेदपाठक, गोविंद वेदपाठक, भिवाजी शिंदे, विकी गाढवे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला भूसंपादन तथा उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे हे अधिकारी उपस्थित होते.
- अक्कलकोट-नळदुर्ग हायवेच्या प्रश्नावर बैठक लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, रिंग रोड संदर्भात शेत जमिनीला प्रति गुंठा तीन ते पाच लाख रुपये दर मिळावा अशी मागणी संघर्ष समितीने केली. या मागणीवर शंभरकर यांनी त्या भागात झालेल्या खरेदी विक्रीचे पुरावे द्या त्यानुसार दर देऊ असे आश्वासन दिले. दरम्यान माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी अपेक्षित दर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देत सोमवारी रास्ता रोको करणार असल्याचे सांगितले.