सोलापूर – जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण तुकडी क्र. ४ चा शुभारंभ पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहंका बोधनकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी महिला प्रशिक्षणार्थी सुमन ज्ञानदेव गायकवाड उपस्थित होत्या.
प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बोधनकर यांनी कुक्कुटपालन हा शेतीपूरक जोडव्यवसाय ठरून पशुपालकांचे अर्थार्जन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे सांगितले. सदर प्रशिक्षण २४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून शेतमजूर, महिला व सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय सुरु करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी पार पडलेल्या प्रशिक्षण तुकड्यांतून अनेक यशस्वी कुक्कुटपालन व्यावसायिक निर्माण झाले असून त्यांची यशोगाथा पशुसंवर्धन विभागाच्या महापशुधनवार्ता मासिकात प्रसिद्ध झाली आहे. त्याच धर्तीवर नव्या तुकडीतील प्रशिक्षणार्थ्यांनीही स्वयंउद्योजक बनून आर्थिक स्तर उंचावावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. पी. माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिनानाथ जमादार व संताजी देशमुख यांनी परिश्रम घेतले. पुढील तुकडीसाठी जिल्ह्यातील पशुपालकांनी नोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

