नवी दिल्ली : नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे अशी मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. कलम 85 नुसार राष्ट्रपती या संसदेचं सत्र बोलवतात. तसेच 87 नुसार त्याचं संसदेत अभिभाषण देखील होतं. ज्यामध्ये राष्ट्रपती दोन्ही सदनांना संबोधित करतात. तसेच संसदेमधील सगळी विधेयकं ही राष्ट्रपतींच्या मंजुरीनेच कायदेशीर केली जातात. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात यावं, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि पी.एस. नरसिम्हा यांच्या सुट्टीतील खंडपीठासमोर होणार होती. परंतु ही याचिका न्यायालयाने दाखलही करुन घेतली नाही. सी.आर. जयसुकिन नावाच्या वकिलाने ही याचिका दाखल केली होती. दरम्यान नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन होणार असल्याने या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.