सोलापूर : अज्ञाताने रात्रीच्या वेळी तरुणास रस्त्यात अडवून मारहाण करून त्याच्याजवळील १७०० रुपयांची रोकड आणि मोबाईलमधील फोन पे वरून ८ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांकडे गुन्हा दाखल होता. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात नितीन विठ्ठल भोसले (वय २८ वर्षे, रा. २७/३, सग्गम नगर, जुना विडी घरकुल, सोलापूर) याला गजाआड केलंय. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की, शुक्रवारी, ०५ एप्रिल रोजी रात्री शेळगी मित्र नगरातील बिराजदार हायस्कूल जवळ अज्ञात तरुणाने प्रवीण मुरारी सागर (रा. सोलापूर) याला रस्त्यात अडवून मारहाण करून त्याच्या जवळील रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर त्याच्या मोबाईल फोन पे अकाउंट वरून आठ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांकडे भादविक ३४१, ३९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी गुन्हे शाखेकडील सपोनि श्रीनाथ महाडिक व त्यांचे तपास पथक या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीची माहिती काढत असताना, सपोनि महाडिक यांचे तपास पथकास, सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी जुन्या विडी घरकुलातील सिफा बेकरी येथील एका घरासमोर मोटार सायकलीवर बसलेला असल्याची माहिती मिळाली.
त्यावरुन तपास पथक सोबत पंच घेऊन त्या ठिकाणी गेले असता, संशयित नितीन विठ्ठल भोसले, वय २८ वर्षे, रा. २७/३, सग्गम नगर, जुना विडी घरकुल, सोलापुर हा मिळून आला. तो अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याने, त्याचेकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता, त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिलीय. त्याने प्रवीण सागर याच्याकडून जबरीने काढून घेतलेली रोख रक्कम १७०० रुपये जप्त करण्यात आले.
त्याने फिर्यादी यांच्या मोबाईलवरुन जबरदस्तीने त्याचे फोन पे वर ८ हजार रुपये ट्रान्स्फर केल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचा मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल इत्यादी मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरीता जोडभावी पेठ पोलीस ठाणेच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीनाथ महाडीक, पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजीत धायगुडे यांनी पार पाडली.