येस न्युज मराठी नेटवर्क : आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी सकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत (बुधवारी सकाळी ८.०० ते गुरुवारी सकाळी ८.०० वाजेपर्यंत) ११,६६६ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर याच वेळेत तब्बल १४,३०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी एकूण १२३ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय.
गेल्या आठवड्याभरात देशातील १४७ जिल्ह्यांत एकही करोना रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलीय. तसंच १८ जिल्ह्यांत गेल्या १४ दिवसांपासून, ६ जिल्ह्यांत गेल्या २१ दिवसांपासून तर २१ जिल्ह्यांत गेल्या २८ दिवसांपासून एकही रुग्ण आढळलेला नाही.
देशातील एकूण रुग्णांपैंकी जवळपास ७० टक्के रुग्ण हे केवळ महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळले. ब्रिटनच्या नव्या करोनाचे देशात एकूण १५३ रुग्ण आढळल्याचंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय.
राजधानी दिल्लीतही करोना संक्रमण स्थिती नियंत्रणात आल्याची चिन्हं आहेत. दिल्लीत तब्बल नऊ महिन्यानंतर एका दिवसात १०० पेक्षा कमी रुग्णांची नोंद करण्यात आलीय. याअगोददर गेल्या वर्षी ३० एप्रिल रोजी राजधानीमध्ये एका दिवशी ७६ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी हा आकडा एका दिवसात आठ हजारांवर पोहचला होता. परंतु, आता मात्र ही संख्या आटोक्यात आलीय.