सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी गेल्या 15 -18 वर्षापासून अतिशय तुटपुंजा मानधनात प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देत आहोत. आरोग्य विभागाचा सर्व डोलारा आमच्या कंत्राटी बांधवांवर उभा असून आमच्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना पगार आरोग्य संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापेक्षाही कमी वेतन दिले जात आहे. कोविड महामारी मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी बांधव हे फ्रंट लाईन वर्कर म्हणून कार्यरत होते. तसेच शासनाच्या सर्व आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी कंत्राटी बांधवच रात्रंदिवस कष्ट करत आहेत.
शासनाने रिक्त जागा वरतीच टक्के समायोजनाचा जो निर्णय घेतला आहे त्याला खूप वेळ जाणार आहे तसेच काही पदांचे समावेशन होऊ शकत नाही त्यामुळे कुठलीही अट न ठेवता सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे सरसकट समावेशन करण्यात यावे आणि समावेशन होईपर्यंत कायम कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी हीच आमची मुख्य मागणी आहे.आम्ही आयुष्याची 15 ते 18 वर्षे अतिशय कमी वेतनावर शासनास आरोग्य सेवा दिली आहे. वारंवार मागणी करून देखील कंत्राटी बांधवांच्या मागण्यांचा विचार झाला नाही त्यामुळे सर्व कंत्राटी बांधवांना नाईलाजाने आंदोलनात उतरावे लागले. याचा विचार करून शासनाने तात्काळ समायोजनाचा निर्णय घ्यावा व समायोजन होईपर्यंत कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी. अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे