चिंचवडमध्ये सगळ्यांचे लोकप्रिय आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेले राहुल कलाटेदेखील बंडखोरी करण्यावर ठाम आहे.
कसबा आणि चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. दोन्ही मतदार संघात दोन तगडे नेते बंडखोरी करणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कसबा मतदार संघात महाविकास आघाडीची उमेदवारी कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना देण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना घोषित करण्यात आली आहे. या दोघांना उमेदवारी दिल्याने कसब्यात कॉंग्रेसचे तगडे नेते बाळासाहेब दाभेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर चिंचवडमध्ये सगळ्यांचे लोकप्रिय आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेले राहुल कलाटेदेखील बंडखोरी करण्यावर ठाम आहे.
कसब्यात कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर बंडखोरी करणार
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. मोदी गणपतीपासून बाईक रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करत कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. एकीकडे टिळकांना उमेदवारी न दिल्याने हिंदू महासंघ पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने रविंद्र धंगेकर यांना उमेदवार घोषित केल्याने कॉंग्रेसचे नेते बंडखोरी करणार आहेत.
राहुल कलाटे करणार बंडखोरी
त्याचबरोबर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. सुरुवातीपासून ही जागा राहुल कलाटेंनाच मिळण्याची दाट शक्यता होती. त्या प्रमाणे कार्यकर्तेदेखील कामाला लागले होते. मात्र ऐनवेळी ही जागा महाविकास आघाडीने राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना घोषित केली. त्यामुळे राहुल कलाटे मोठं शक्ती प्रदर्शन करत बंडखोरी करणार आहे. आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राहुल कलाटे यांनी 2019 मध्येही बंडखोरी केली होती. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळी दोघांमध्ये अटीतटीची निवडणूक झाली होती. यावेळीदेखील निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. जनता माझ्या पाठीशी, माझ्याबाजूने जनतेची सहानुभूती आहे. माझ्यासारख्या उमेदवाराला संधी मिळावी म्हणून जनता मला संधी देईल. असा विश्वास बंडखोरीच्या तयारीत असलेल्या राहुल कलाटे यांनी व्यक्त केला आहे. राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे चिंचवडची निवडणूक रंजक घडामोडी बघायला मिळणार आहे
भाजपकडून टिळकांना डावललं तर जगताप कुटुंबियांना न्याय
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीकरीता भाजपकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीकरीता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.