सोलापुर – राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समोर सोलापुरात कांदा दर प्रश्नावर शेतकऱ्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला तरीही शेतकरी आक्रमक होते.सात रस्त्यावरील जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री विखे-पाटील यांच्या उपस्थितीत अनेक तास विविध विकास प्रश्नांवर बैठकांवर बैठका चालू होत्या. या बैठका सुरू असतानाच नियोजन भवनात प्रवेश केलेल्या जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कांद्याच्या घसरलेल्या दराच्या प्रश्नावर घोषणाबाजी सुरू केली. विखे-पाटील यांची भेट घेण्यासाठी हे शेतकरी आंदोलक आले होते. कांदा दर प्रचंड खाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने विधिमंडळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही दिली आहे.
शेतकऱ्यांचा कांदा नाफेडमार्फत खरेदी करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी तात्काळ होत नाही. त्यामुळे जनहित शेतकरी संघटनेने सोलापुरात पालकमंत्री विखे-पाटील यांच्या गळ्यात कांद्यांचा हार घालून निषेध नोंदविण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विखे-पाटील यांच्या सोलापूर दौऱ्यात सुरक्षा व्यवस्था वाढविली होती. विखे-पाटील यांची भेट होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे पाहून शेतकरी आंदोलक संतापले. संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांची पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाचीही झाली. तेव्हा आक्रमक पवित्रा घेतलेल्या देशमुख यांनी विखे-पाटील यांची मोटार फोडण्याचा इशारा देत जोरदार घोषणाबाजी सुरू केली.