येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यात ७१४ व्यक्तींना २४ तासात करोना ची बाधा झाली आहे .यामध्ये ४५२ पुरुष आणि २६२ महिलांचा समावेश आहे. बार्शी, माढा, माळशिरस आणि पंढरपूर या चार तालुक्यात २४ तासात शंभरपेक्षा अधिक व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. बार्शी शहर व तालुक्यात १२९, पंढरपूर शहर व तालुक्यात १४२, माढा तालुक्यात १०१ आणि माळशिरस तालुक्यात १०२ नवीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अजूनही वाढतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ४८६३ कोरोनाबधित उपचार घेत आहेत. यापैकी बार्शी शहर व तालुक्यात ७५७,करमाळा तालुक्यात ६१२, माढा तालुक्यात ७२७, माळशिरस तालुक्यात ८७२ आणि पंढरपूर तालुक्यात ७६३ व्यक्तींवर रुग्णालयात उपचार चालू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांनी सांगितले .शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यामध्ये सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील ६७ वर्षाची महिला , दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट येथील ६२ वर्षाची व्यक्ती, बार्शी येथील चोरमले प्लॉट येथील ८० वर्षाची महिला, बार्शी येथील मालवंडी या गावातील ७५ वर्षांची महिला, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहल्ली येथील ४५ वर्षांची व्यक्ती, सांगोला तालुक्यातील वासुद येथील ६० वर्षाची व्यक्ती आणि मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील ६५ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.