सोलापूर : सोलापूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सन 2025- 26 या आर्थिक वर्षाचे 1293 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. यामध्ये महापालिकेचे स्वतःचे उत्पन्न 773 कोटी रुपये तर शासनाकडून 423 कोटी रुपयांचे अनुदान मिळेल असे गृहीत धरले आहे. या अंदाजपत्रकात कोणताही कर वाढविण्यात आला नाही. सोलापूर महापालिकेचा खर्च कमी करणे आणि जास्तीत जास्त उत्पन्न वाढविणे यावर आमचा येणाऱ्या कालावधीत भर राहील असे मनपा आयुक्त ओंबासे यांनी सांगितले.









सोलापूर महानगरपालिकेवर ड्रेनेजसाठी काढलेले 96 कोटी रुपये आणि उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी काढलेले 24 कोटी रुपये असे 120 कोटी रुपयांचे कर्ज आहे तर महापालिकेचा आस्थापना खर्च 43 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोलापूर महापालिकेला दरवर्षी सुमारे 90 ते 95 कोटी रुपये वीस बिल भरावी लागते. शहरात बीओटी बांधकामे बांधून त्याद्वारे उत्पन्न वाढवणे तसेच इतर सहा महिन्यात उड्डाणपूलाचे संपूर्ण भूसंपादन करून भारतीय राष्ट्रीय महामार्गाकडे दोन्ही उड्डाणपुलाच्या जागा वर्ग करणे यावर भर राहील. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपायुक्त रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून नागरिकांनी देखील आपल्या सूचना त्यांच्याकडे द्याव्यात असे आवाहन देखील आयुक्तांनी केले.