कोरोना लसीच्या वापराला मंजुरी; मोदींकडून देशवासीयांचे अभिनदंन
भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या दोन लसी भारतात तयार झाल्या आहेत, याचा प्रत्येकाला अभिमान आहे. आत्मानिर्भर भारतचे स्वप्न पूर्ण करण्याचं हे एक महत्वाचं पाऊल आहे. परवानगी मिळाल्याच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशवासियांचं अभिनंदन केलं आहे.
चंद्रकांत पाटलांचं रश्मी ठाकरेंना पत्र
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनातील भाषेबद्दल आक्षेप संपादिका रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं असून, वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात, वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. एक व्यक्ती म्हणून मी तुम्हाला चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की, आपणालाही ही भाषा आवडत नसेल. आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा! असं चंद्रकांत पाटलांनी पत्रात म्हंटल आहे.
अखेर कष्टाचं चीज झालं; पुनावाला यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केला आनंद
कोविशिल्ड लसीला मंजुरी देण्यात आल्यानंतर सीरम इन्सिस्ट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने पत्करलेल्या सर्व अडचणींचं अखेर यश मिळालं. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे आणि पुढील काही आठवड्यात लोकांना देण्यासाठी तयार आहे,”असं सांगत पुनावाला यांनी आपल्या आनंदी भावना व्यक्त केल्या.
कारखान्यांना थकहमी देण्यास सरकारचा नकार
शेतकऱ्यांना उसाची रास्त आणि एफआरपी देण्यासाठी पैसेच नसल्याने सहकारी साखर कारखान्यांनी पुन्हा एकदा राज्य सहकारी बँकेकडे तारण कर्जाची मागणी केली आहे. मात्र, साखर कारखान्यांना कर्जासाठी शासन हमी देण्याचा राज्य सहकारी बँकेचा प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळून लावल्याने कारखान्यांची डोके दुखी वाढली आहे.
सोलापूर । लक्ष्मी मार्केटमधील गाळे लिलाव प्रक्रिया रद्द
सोलापूरच्या लक्ष्मी मार्केट येथील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया महापालिकेने सुरू केली होती. त्यास तेथील व्यापाऱ्यांचा विरोध होता. याबाबत महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्यात शनिवारी बैठक झाली. तेथील गाळे जुन्या व्यापाऱ्यांना रेडिरेकनर दरानुसार भाडे आकारून देण्याचा निर्णय बैठकीत झाला. तसेच सुरू करण्यात आलेली लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याची माहिती, आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
सोलापूर । शहराचा पाणीपुरवठा एक दिवसांनी पुढे
टाकळी ते सोलापूरदरम्यान असलेल्या जलवाहिनीस पाच ठिकाणी गळती असल्याने त्याचे दुरुस्तीचे काम सोमवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारपासून एकवेळचे शहराचे पाणीपुरवठा चार दिवसाआड करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख सिध्दप्पा उस्तरगे यांनी दिली. जलवाहिनीस गळतीसह शुक्रवारी टाकळी पंप हाऊस येथे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहरास आवश्यक असलेले पाणी उपलब्ध झाले नाही.
उपमहापौर काळेंवर गुन्हा दाखल, भाजपकडून कारवाईचा निर्णय नाही
सोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने शहर भाजपकडून प्रदेश कार्यालयाकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यावर पक्षाकडून शनिवारी निर्णय होणे अपेक्षित होते. पण अद्याप झाला नाही. याबाबत सोमवारी निर्णय होईल, असे शहराध्यक्ष विक्रम देशमुख म्हणाले.
मराठा आरक्षणप्रकरणी केंद्राने अध्यादेश काढावा – अशोक चव्हाण
मराठा आरक्षणाचा विषय नव्या सूचित घेण्याचा निर्णय घेऊन याप्रकरणी केंद्राने अध्यादेश काढावा आणि मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवावा, केंद्राला या संदर्भात पत्र लिहिण्यास आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत. अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
अँजिओप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, करोना चाचणी निगेटिव्ह
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर सौरव गांगुलीची करोना चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे
मनपाकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महापौर यांच्या कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी सभागृहनेते श्रीनिवास करली, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेविका संगीता जाधव,नगरसेविका निर्मला तांबे आदी उपस्थित होते.